“मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाची पाहणी“
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी केली. या संमेलनासाठी निवडलेल्या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान हे साहित्य संमेलन दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहे.
साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. यावेळी साहित्य संमेलनाचे निमंत्रक सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, समन्वयक डॉ. शैलेश पगारिया तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
संमेलन परिसरातील नामकरण व व्यवस्था
- संमेलनाच्या विविध प्रवेशद्वारांना महान व्यक्तींच्या नावाने ओळख देण्यात आली आहे.
- मुख्य प्रवेशद्वार: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
- अतिविशिष्ट प्रवेशद्वार: थोरले बाजीराव पेशवे
- सभागृह क्रमांक 1: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- सभागृह क्रमांक 2: यशवंतराव चव्हाण
- व्यासपीठ: स्व. काकासाहेब गाडगीळ आणि स्व. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
या ठिकाणी 4000 व्यक्तींसाठी बैठक व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती संजय नहार यांनी मंत्री उदय सामंत यांना दिली.
विशेष साहित्य रेल्वे आणि नियोजन
पुण्यावरून विशेष साहित्य रेल्वे 19 फेब्रुवारीला दिल्लीकडे प्रस्थान करणार आहे. या रेल्वेमध्ये साहित्य परिसंवाद तसेच कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या संपूर्ण नियोजनाची माहिती संजय नहार यांनी मंत्री उदय सामंत यांना दिली. महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण पाठबळ या संमेलनाला असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
